भारतीय कला बद्दल माहिती | Indian Art Information in Marathi | भारत देशाची ओळख | भारत देशाची संपूर्ण माहिती
Indian Art Information in Marathi : प्राचीन भारताच्या इतिहासात कलेला महत्वाचे स्थान होते. प्रागैतिहासिक काळापासूनच मानवाला कलेची आवड आहे. कला विविध प्रकारची असते. गुप्त काळात कला आणि स्थापत्याच्या क्षेत्रात भरीव स्वरुपाची प्रगती झाली. प्राचीन काळात मूर्तिकला, वास्तुकला, संगीत कला, नृत्यकला आणि चित्रकलेत मानवाने चांगलीच प्रगती केली होती.
कला ही मानवाच्या आवडीचा विषय आहे. मानवी जीवनाच्या सर्वोत्कृष्ट साधनांचे रूप कलेच्या माध्यमाने प्रकट होते.
कला ही मानवाच्या सृजन आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या कल्पनेवर अवलंबून असते. मानवी जीवनात जे सुखद आणि आनंददायी अनुभव मिळालेले असतात, तेच कलेच्या माध्यमातून प्रकट होतात. कला ही कलाकाराच्या आंतरिक भावना, अनुभव, विचार व कल्पनेवर अवलंबून असते. स्थापत्य, वास्तू, काव्य, शिल्प, चित्र, नाट्य, संगीत इ. प्रकारांना ‘कला’ असे अभिधान आहे.
मौर्य काळापासून वास्तुशिल्प कलेचा प्रारंभ झाला. मौर्य सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राजाश्रय देऊन त्याचा प्रचारही केला. मौर्य काळापासूनच डोंगरात चैत्य आणि विहार नावाच्या नवीन वास्तू निर्माण करण्यास प्रारंभ झाला. बौद्ध धर्माशी संबंधित चैत्य व विहार, जैन धर्माशी संबंधित जैन मंदिरे आणि हिंदू धर्माशी संबंधित अनेक देवदेवतांची मंदिरे अस्तित्वात आली.
मानवाने हिंदू, बौद्ध, जैन आणि लौकिक मूर्तिशिल्पांची निर्मिती केली. वास्तुकलेतही चांगलीच प्रगती झालेली होती. वास्तुकलेत मंदिरे, विहार, स्मारके, स्तूप आणि लेणी स्थापत्याचा समावेश होतो. कांची, महाबलीपूरम, ऐहोळी, गांधार, पट्टदकल, वेरुळ, कंधार, कार्ले, भाजे, अजिंठा, पितळखोरा, बाघ, सांची, सारनाथ, अमरावती, आग्रा, फतेहपूर सिकरी, भुवनेश्वर आणि कोणार्क ही भारतातील कलेची केंद्रे होती.
आणखी माहिती वाचा : भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
याशिवाय अनेक ठिकाणी विभिन्न प्रकारच्या कलेचा विकास झाला. या कलेला अनेक राजघराण्यांनी आश्रय दिला. यामध्ये सातवाहन, गुप्त, वाकाटक, राष्ट्रकूट, बदामी व कल्याणीचे चालुक्य, यादव, गंग आणि चोल घराणे उल्लेखनीय ठरते. प्रस्तुत ग्रंथात प्राचीन आणि मध्ययुगातील निवडक कला व वास्तुकलेचा इतिहास दिलेला आहे.
इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकातील मोहें-जो-दडो, हडप्पा या सिंधू संस्कृतीच्या कलेपासून भारतीय दृश्य कलांची सुरुवात होते. पण खास भारतीय अशा कलाशैलींची सुरुवात इ. स. पू. तिसऱ्या शतकातील मौर्य काळापासून होते. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी ही कला निर्माण झाली.
ब्राह्मणी मानल्या गेलेल्या हिंदू कलाविष्कारांचा उद्गम त्याबरोबर अहमहिकेने झालेला दिसतो. तेथपासून तहत मोगल आणि नंतरच्या संस्थानिक लघुचित्रशैलीपर्यंत परंपराप्राप्त भारतीय दृश्य कलांना नवनवे बहर येत राहिले. मूर्तिपूजेच्या प्रभावातून उपजलेली ही कला वैदिक तत्वज्ञानाचा वारसा सांगत येते. भारतीय संगीताचे मूळसुद्धा सामवेदिक संगीतात आहे, असे मानले जाते.
वेदामध्ये मानवाच्या अतिआदिम प्रेरणाचे संगोपन केलेले आहे. पण निसर्गपूजक आर्यांचा मूर्तिपूजेला कडवा विरोध होता. निसर्गातील चैतन्य शक्तीमध्ये काही एक ‘ऋत’ म्हणजे नियततत्व आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. म्हणून ‘इंद्र’ या त्यांच्या केवलरूप ईश्वरी तत्वाचा आविष्कार त्यांना आकाशातील सूर्याच्या प्रकाशात दिसे तसाच तो अंतरिक्षातील विजेच्या लखलखाटात आणि पृथ्वीवरील अग्नीमध्ये दिसे.
निसर्गाशी संवाद साधीत निसर्गशक्तीशी एकरूप होण्याची त्यांना तीव्र आकांक्षा होती. मूर्तिपूजा त्यांना थिटी वाटावी हे साहजिक असताना मूर्तिपूजक कलेचा आणि संस्कृतीचा स्त्रोत आर्यांच्या तत्ववृत्तीत शोधणे तर्कतः विसंगत ठरते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वैदिक संस्कृतीचा विकास या आपल्या ग्रंथात याची तार्किक उकल केली आहे. अग्नी, आप, वायू इ. निसर्गतत्वांचे अस्तित्व मानवी शरीरातही असल्याचे कालांतराने आर्यांच्या प्रत्ययास आले. ‘पिंडी तेच ब्रह्मांडी’ या सूत्राचा स्वीकार करून विश्वचैतन्यावर त्यांनी ‘पुरुषा’चे रूपक केले व अग्निचयन यज्ञाच्या वेदीवर या पुरुषाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
मूर्तिपूजेचा स्वीकार असा झाला आणि पुढील काळात सगुण उपासनेसाठी मूळच्या निर्गुण निराकार चैतन्याची नानाविध मूर्तिबद्ध रूपे बहरून आली. हिंदू व बौद्ध संस्कृती समृद्ध झाली. दगड, धातू यांसारख्या जड माध्यमांमध्ये आकारित झालेल्या या दैवी रूपामध्ये विश्वचैतन्याची लयबद्ध प्रवाहिता भरून आली.
आणखी माहिती वाचा : भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India in Marathi | भाग : 5
मौर्योत्तर ते गुप्तपूर्व काळातील कलेचे स्वरूप | Art Forms from Post-Mauryan to Pre-Gupta Periods
मध्य व पूर्व भारतात स्तूप हा वास्तुप्रकार प्रामुख्याने आढळतो. बहुतांश स्तूपांचे फक्त भग्नावशेष सापडतात. सांचीचा स्तूप क्रमांक एक सर्वांत महत्वाचा असून सुस्थितीत आहे. भारहूत आणि अमरावती येथील स्तूपांवरील कोरीव काम सांचीच्या मानाने प्राथमिक अवस्थेतील आहे.
भारहूत इ. स. पू. दुसऱ्या आणि सांची इ. स. पू. पहिल्या शतकातील आहेत. विशाल अर्धगोलाकार स्तूपाभोवती कठडे आहेत. कठड्यांना चहूदिशांना दारे आहेत. स्तूपांचे अर्धगोल विटांनी रचलेले तर इतर बांधकाम हे लाकडी तुळ्यांच्या खांबासारखी दगडांची रचना करून केलेले आहे.
अशोकस्तंभावर धर्मचक्रप्रवर्तनाचे प्रतीक म्हणून आलेले चक्र दारावर महत्वाच्या जागी येते. इतरही बौद्ध प्रतीके येतात. सर्पाकृती वेटोळे हे गतिशीलतेचे व आदिम चैतन्याचे प्रतीक तुळ्यांच्या दोन्ही टोकांवर असल्याने भोवतालच्या अवकाशाला गतिशील करते. शुभसूचक, स्वागतशील शालभंजिका वृक्षाला बिलगलेल्या स्थितीत झोकदारपणे मांडलेल्या आहेत.
अगदी सुरुवातीच्या शिल्पविहीन गुंफा अशोककालीन असून त्या बरोबर टेकड्यांमध्ये सापडतात. पण लेणीशिल्पांची खरी सुरुवात इ. स. पू. दुसऱ्या शतकातील भाजे आणि वेडसे येथे झालेली दिसते. इ. स. पू. पहिल्या शतकात मनमोडा, नाशिक, पितळखोरा, कार्ले येथील लेणी झाली. अजिंठ्यातील सुरवातीचे क्रमांक दहा हे लेणे याच काळातील. अजिंठ्यातील इतर लेणी तसेच वेरूळ आणि बाघ येथील लेणी गुप्तांच्या सुवर्णयुगातील आहेत.
सुरुवातीच्या लेणीशिल्पांवर मृत्तिकाविलेपन तंत्राचा व लेणीवास्तूंवर लाकूडघडणीचा प्रभाव दिसतो. चैत्यांच्या अर्धदंड गोलाकृती छताला गरज नसतानाही लाकडाच्या कमानी फासळ्यांसारख्या रचून त्यांचा आधार दिला आहे. अजिंठ्यातील दहा क्रमांकाच्या लेण्यामधील छताला आधार देणारे खांब आतल्या बाजूला कलते ठेवलेले आहेत. लाकूडकामाच्या काळापूर्वी बांबूच्या वास्तुरचनेचा काळ होता त्याचे अवशेष या कलत्या खांबांमध्ये दिसतात.
स्तूपांच्या मूळ संकल्पनेमध्ये आर्यांच्या संस्कृति-रीतीचा सहभाग आहे, असे ई. बी. हॅवेल यांचे मत आहे. राजा किंवा अन्य विभूतीच्या मृत्यूनंतर स्तूपासारखे, पण तुलनेने लहान आणि बहुधा बांबूचे अर्धगोल उभारून त्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी असेच कठडे बांधले जात.
काही विद्वानांच्या मते अर्धगोलाकृती मातीचा ढिगारा (माँड) पुरलेल्या प्रेतावर उभारण्याची प्रथा आदिम आहे. बुद्धाचा धर्म हा बहुजन समाजाचा धर्म होता. म्हणून बहुजन समाजाच्या आदिम रीतीचा प्रभाव बुद्धाच्या स्मारकावर पडावा, हे नैसर्गिक ठरते. या भव्य अर्धगोलांशी छत्र – अंतराळ असे अनेक कल्पनांचे साहचर्य जुळते. बोधिवृक्षाखाली बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, त्या वृक्षाच्या विस्ताराशीही त्याचे साहचर्य मानले जाते.
स्तूपाच्या सर्वोच्च बिंदूवर भिंतीचा छोटा चौरस बांधलेला असतो. त्याच्या मध्यभागी उभ्या दंडावर छोटेसे छत्र उभारलेले असते. कलकत्ता संग्रहालयामध्ये असलेल्या वेसनगर येथील कल्पवृक्षाच्या त्रिमितीय शिल्पात पर्णभाराची रचना स्तूपाहूनही गोलाकार भासावी, अशी केलेली दिसते. त्यामुळे वृक्षछत्राच्या कल्पनेला पुष्टी मिळते.
बौद्ध प्रभावाच्या काळात व्यक्तीहून समष्टीला महत्व आले. या समष्टिचैतन्याचे पहिले आविष्कार बौद्ध कलेतून साकार झाले. शुंग-सातवाहन काळातील बौद्ध शिल्पांमध्ये मुख्यतः जातककथांचे निरूपण आहे. त्यात बोधिसत्वासह सर्व मानवी आणि अन्य आकार समूहवृत्तीने संघटित केलेले दिसतात.
विवक्षित आकारांना महत्व दिलेले नाही. या संघटनेला चौकट असूनही तिचे विशेष भान असे नसते. चौकटनिरपेक्ष अवकाशात रमण्याच्या पहिल्या व्याधमानवाच्या आदिम प्रवृत्तीचे पडसाद त्यात दिसतात. पुढील गुप्तकाळात अजिंठ्यातील चित्रांत भिंतीची नैसर्गिक चौकटसुद्धा नाकारली गेली. भिंती – छतांसह खांबादीही सलग रंगविल्यामुळे अंतराळासह सर्व दिशा भारून टाकल्याचा भास यांतून निर्माण होतो.
गुप्तकालीन कलाविशेष | Art of the Gupta Period
गुप्तकाळामध्ये काही प्रमुख आणि इतर गौण, अशी मानवाकृतींची विभागणी झाली. नाक, कान, डोळे, भुवया, हस्तमुद्रा यांवर रेषात्म लयीचे संस्कार होऊन त्यांचे ह्रदय, वेधक आदर्शीकरण झाले. समभंग, अतिभंग वगैरे क्रियावस्था (अँक्शन) वापरल्या गेल्या, तरीही शुंग – सातवाहन काळात सर्वव्यापक झालेली लय तितकीच प्रबळ राहिली.
अजिंठ्यातील चित्र शिल्पांत ती ओतप्रोत भरलेली आहे. वेरूळमधील अवशिष्ट चित्रे नगण्य आहेत. पण शिल्पे आणि एकूण वास्तुघटकांच्या संघटनेतून निष्पन्न होणाऱ्या समग्र आकृतीत या लयीचे विराट दर्शन होते. कैलास लेणे याच कारणासाठी जगप्रसिद्ध झाले. तिचे लोण गुप्तोतर काळातील महाबलिपुर, घारापुरी आणि तदनंतरच्या मंदिरशिल्पापर्यंत उत्तरोत्तर विस्तारत गेले.
गुप्तशैलीतील अभिजात ओजस्विता आणि डौल यांची पायाभरणी शुंग-सातवाहनोत्तर कुशाण काळातील अमरावती आणि विशेषतः मथुरा शैलीतून सुरू झालेली दिसते. इ. स. दुसऱ्या शतकातील अमरावती स्तूपामधील निलगिरी हत्तीचे दमन हे वर्तुळाकारातील उत्थित शिल्प (सध्या मद्रास म्यूझियममध्ये असलेले) शिल्पकलेच्या दृष्टीने लक्षणीय आहे.
तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात मोडणारे याच शैलीतील जैन तीर्थंकराचे शीर्ष हे आध्यात्मिक भावघनतेचा पाषाणातून घेतलेला वेधच म्हणावा लागेल. दुसऱ्या शतकातील मथुरा स्तूपाच्या दगडी खांबावर कोरलेल्या तीन यक्षींच्या देहयष्टी म्हणजे जणू विधीपूर्वक लय संस्कारित केलेले स्त्रीत्वाचे विलोभनीय उन्मेष आहे. गुप्तोतर → खजुराहो मध्ये या संस्कारसिद्धीचे उच्चतम शिखर गाठले जाते.
इ. स. चौथ्या शतकापासून सहाव्या शतका पर्यंत गुप्तकाळ पसरलेला आहे. बौद्ध, ब्राह्मणी आणि जैन कलांना गुप्तांनी सारखाच राजश्रय दिला. दृश्य कला, संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य, तत्वज्ञाने आणि अन्य शास्त्रे यांची उदंड वृद्धी या काळात झाली. विद्या आणि कला यांचा व्यासंग स्वतः राज्यकर्त्यांनीही केला.
दृश्य कलांविषयी थोडीफार चर्चा करणारा विष्णुधर्मोत्तर नामक पुराणग्रंथ या काळातील होय. चित्र शिल्पांतील देवतांविषयींची लक्षण प्रमाणे या काळात निश्चित केली गेली. अजिंठा, वेरूळ येथील प्रचंड प्रकल्प याच काळात पूर्णत्वास पोहोचले. कालिदासासारखा महाकवी या काळात झाला.
हीनयान पंथात बुद्धाचे प्रत्यक्ष चित्रण न करता ते प्रतीकात्म पद्धतीने सूचित करावयाचे, अशी प्रथा होती. ती मोडून महायान पंथात बुद्धाचे सरळ चित्रण केले गेले. त्यामुळे विविध अवस्थांत त्याचे विलोभनीय दर्शन घडले.
सातव्या शतकातील कनौजच्या सम्राट हर्षवर्धनाने गुप्तांचा सर्व वारसा वृद्धिंगत केला. उत्तरेतील गुप्त हर्षांना समांतर अशी दक्षिणेत प्रथम चालुक्य, नंतर राष्ट्रकूट आणि वाकाटक, पूर्वेत पाल, सेन आणि दक्षिण भारतात पल्लव ही साम्राज्ये होती. ह्यातील शेवटची गुप्तांनंतरही टिकली.
या सर्वांनी गुप्तांप्रमाणेच विद्या आणि कलांच्या वृद्धीसाठी उमेद पणाला लावली. हे उत्तेजक वातावरण आठव्या शतकातील पश्चिमेतील घारापुरी आणि दक्षिण पूर्वेतील महाबलिपुर या प्रकल्पांपर्यंत टिकले.
गुप्तांचा काळ हे भारतातील सुवर्णयुग मानले जाते आणि गुप्तशैली हा भारतीय अभिजाततेचा परमोत्कर्ष मानला जातो. ‘शांत महत्ता’ आणि ‘खानदानी प्रासादिकता’ (नोबल सिंप्लिसिटी) ही पश्चिमी विचारवंत विंकेलमानने उद्घोषिलेली अभिजाततेची दोन्ही तत्त्वे या शैलीत पूर्णत्वाने प्रतीत होतात. अलंकरण शक्यतो टाळून किंवा नाममात्र स्वीकारून पाषाणाच्या घनतेचा वेध घेत शिल्प उभारणे, हे या शैलीचे वैशिष्ट्य.
अंजिठ्यातील भित्तिचित्रांत कथेच्या निवेदनक्रमानुसार त्या त्या प्रसंगातील मानवी आणि इतर आकारसमूहांची मांडणी करताना तीत रेषात्म प्रवाहिता आणून सर्व चित्रपृष्ठावर रसिकांचे लक्ष फिरवीत नेले आहे. समूहांमध्ये विशेष अवकाश सोडलेला नसल्याने प्रथमदर्शनी ही नुसती आकारांची गर्दी वाटते. पण बारकाईने पाहिल्यास या प्रेरणा कुशलतेने वापरल्या असून लक्ष कुठेही अडत नाही, गोंधळत नाही, हे ध्यानी येऊन जाणकार रसिक थक्क होतो. रेषेची ही प्रवाहिता आणि मानवी, विशेषतः स्रीदेहाचा, लावण्यघाट यांमुळे अंजिठ्याची ख्याती जगभर झाली.
चैत्य गुंफेमध्ये शिरताक्षणीच डावीकडील भिंतीलगत भिंतीच्या पूर्ण लांबीइतकी, उजव्या कुशीवर शांत पहुडलेली, बुद्धाची भव्य घनाकृती दिसते. तिचे शीर्ष दरवाजाकडे आहे. साधरण छातीइतक्या उंचीवर ती आहे. मध्ये खांब असल्यामुळे दूर जाऊन दृष्टीच्या आवाक्यात ती सामावून घेणेही शक्य नसते.
तिच्या शांत जमिनीसमांतर रेषा सागरभान (ओशियॅनिक फीलिंग) जागृत करतात. आधारभूत चौथऱ्याच्या पृष्ठावर शोकमग्न मानवांच्या अपोत्थित आकृत्या कोरलेल्या आहेत. डाव्या बाजूच्या दरवाज्यातून येणाऱ्या नित्यस्थिर प्रकाशामुळे छायाप्रकाशाची पृष्ठे जिवंत होतात आणि त्यांचा विलाप काळजाला भिडतो. या शोकमग्न माणसांच्या मध्ये आणखी एक बुद्धाची आकृती असून ती पाठमोरी आहे.
त्यामुळे एक महात्मा आपल्यामधून निघून जात आहे, ही जाणीव हृदयाचा ठाव घेते. वरील खोल भिंतीचा भाग अंधारात बुडून असतो. नजर रुळल्यावर, त्यातील सळसळत वर चढणाऱ्या आकृत्यांकडे लक्ष जाते. एक महात्मा पृथ्वीवरून आपल्याकडे येत आहे म्हणून स्वर्गातील देव आनंदाने बेहोष झाले आहेत. स्वर्गदृश्याची दूरता व शोकदृश्याची समीपता यांमध्ये निर्वाणस्थ महात्म्याचे शांत सागरमान विराट दर्शन देऊन जाते. एका युगाचा मौलिक क्षण येथे विलक्षण ताकदीने साकार केला आहे.
मंदिरवास्तु-शिल्प | Temple Architecture-Sculpture
मंदिरवास्तुशिल्पांचा काळ साधारण चौथ्या शतकापासून सुरू होतो. विजयानगर साम्राज्यापर्यंत त्याची व्याप्ती आहे. लेणी आणि मंदिरे यांना दुवा ठरणारा लेण्यांचा एक मोठा प्रकल्प कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पन्हाळे काजी येथे नुकताच सापडला असून हिंदू, बौद्ध, तंत्रिकांपासून नाथ संप्रदायापर्यंतच्या स्थित्यंतरांचा आलेख त्यावरून स्पष्ट करणे शक्य आहे, असे मत म. न. देशपांडे या पुरातत्ववेत्त्याने मांडले आहे.
येथील बहुतेक लेण्यांचा आणि शिल्पांचा विध्वंस झाला आहे आणि शिल्लक असलेल्यांचा अजून कलादृष्टीने अभ्यास झालेला नाही. गुप्त काळापासून यादवांनंतरही येथील काम चाललेले होते. त्यामुळे शैलीमध्ये विविधता आहे. भूमिस्पर्शमुद्रेतील बोधिसत्व, महाचंडरोषण हे तंत्रिकांचे उग्रतम दैवत आणि गणेश ही शिल्पे कलादृष्ट्या लक्षणीय आहेत.
तांत्रिक पंथाचा प्रसार हिंदू, बौद्ध, जैन या तिन्ही धर्मांमध्ये झाला. वर्तुळे, त्रिकोण, चौरस यांची केंद्रानुवर्ती मांडणी करून मोजक्या प्रतीकात्म रंगांत या आकृत्या रंगवल्या आहेत. श्रीयंत्र हे यांतील सर्वांत महत्वाचे. पायऱ्यांच्या पिरॅमिडप्रमाणे वरती निमुळते होत जाणारे श्रीयंत्रशिल्प हा पुढील मंदिरवास्तूच्या रचनेतील केंद्रवर्ती आकारकल्प ठरला.
मूळची छोटी मंदिरे अगदी चौथ्या शतकांपासूनची दिसतात आणि त्यांत चौरसाकृती रचनेचा हा मूलबंध स्पष्ट दिसतो. महाबलिपुर, पट्टदकल इ. ठिकाणी अशी मंदिरे दिसतात. मंदिरवास्तूच्या पुढील विकासकाळात मुख्य चौरसाकृतीपुढे मंडप, जगमोहन, अंतराळ वगैरे घटक स्थलकालपरत्वे कमी अधिक आले.
तेही बहुधा चौरसाकृती राहिले. लेण्यांमध्ये चैत्यांच्या दंडगोलाकृती छताच्या शेवटी अंतराळासारखा अर्धगोल जोडला गेला. त्याच्या केंद्रबिंदूखाली लहान चबुतऱ्यावर स्तूप आणि त्यावरील चौरसातून वर येणारे छत्र हा पुन्हा तांत्रिक मूलबंधाचाच भिन्न आविष्कार. स्तूपाभोवती प्रदक्षिणामार्ग ठेवले जात, तद्वतच मंदिरांभोवतीही ते ठेवले गेले. ध्रुव प्रदेशातील आदिम आर्यांना दिसलेली ग्रह ताऱ्यांची ‘ प्रदक्षिणा गती’ या आध्यात्मिक विधीमध्ये मूलबंध ठरली, असे म्हणावे लागते.
लेणीप्रकल्प पश्चिम भारतात, प्रामुख्याने महाराष्ट्रात, दिसतात, तर मंदिरप्रकल्प उत्तर व पूर्व भारत, पश्चिमेतील गुजरात, मध्य भारत आणि दक्षिण भारतात दिसतात. महाराष्ट्रात ही परंपरा बहरली नाही. अपवादात्मक मंदिरे महाराष्ट्रात आली. त्यात अंबरनाथचे, आता बरेच भग्न झालेले, अकराव्या शतकातील शिवमंदिर अस्सल परंपरेतील आहे.
गुजरातमधील अबू दक्षिण भारतात हळेबीड, बेलूर, महाबलिपुर, पट्टदकल, ऐहोळे, मदुराई, तंजावर, श्रीरंगम् ओरिसातील भुवनेश्वर, कोनारक आंध्रमधील सिरपूर मध्य प्रदेशातील खजुराहो इ. स्थळे कलादृष्ट्या महत्वाची आहेत.
ओरिसातील मंदिरांच्या जगमोहन, मंडपादी भागांवर पायऱ्यांच्या पिरॅमिडसारखी पाषाणछपरे (पिढे) आहेत. मुख्य गर्भगृहावर मात्र साधारणपणे शिवलिंगाच्या आकाराचा उंचच उंच शिखर भाग, त्यावर चपट्या रायआवळ्यांसारखा शिरांचा आमलक आणि त्यावर कळस अशी रचना केलेली असते.
शिखर पृष्ठांना आडव्या – उभ्या पट्ट्यांनी छेद देऊन त्यावर कोरीव काम केले असल्याने, फुलून पिकलेल्या कणसासारखी समग्र मंदिरवास्तू उत्तेजित होत आकाशात शिरते. कोनारकच्या प्रसिद्ध सूर्यमंदिराची शिखरे पिरॅमिडसारख्या पिढ्यांची आहेत. खजुराहोमधील शिखरे उभ्या घड्यासारखी पृष्ठे मोडून किंचित वक्राकार, निमुळती होत जातात, त्यात शिवलिंग आणि पिरॅमिड यांचा सुवर्णमध्य साधलेला दिसतो. घड्यांच्या पृष्ठामुळे लहानमोठी शतगुणित अंग शिखरे केंद्रीभूत शिखराशी एकजीव केल्याचा भास होतो.
अंबरनाथच्या मंदिरावरील अर्धवट शिल्लक असलेले शिखर आणि त्याच्या अलीकडील मंडपावरचा पायऱ्यांसारख्या पातळ्यांचा पसरट पिढा या दोन्हींचा समोरून दिसणारा संयुक्त आकार पाहिला आणि उजवीकडच्या दुरून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या शिखराकडे नजर टाकली, तर त्यात विलक्षण आकारसाम्य दिसते.
दक्षिणेकडील मंदिरांची अनेकमजली गोपुरे शिखरांसारखीच निमुळती होत जातात. पण ती चौरसाऐवजी आयताकृती पायावर उभारलेली असतात. त्यांवर बारीक अलंकरण आणि विलेपित शिल्पेही आहेत. दुरून पाहिल्यास हे दाट अलंकरण पर्वतावरील वृक्षराजीसारखे भासते.
खजुराहोमधील अनेकपदरी संयुक्त शिखरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंडप आणि अंतराळ यांवरही पिढ्यांऐवजी शिखरेच आहेत. शिखरांच्या घड्यांमधील छोट्या अंग शिखरांमुळे, मुख्य शिखराची झेपावत जाणारी रेषा शतगुणित होऊन उठते. यज्ञवेदीतून शतमुखांनी, जिव्हांनी उठणाऱ्या निश्चल एकतान ज्वालांचे भान त्यातून जागृत होते.
त्याचे मनन केले तर लक्षात येते, की मंदिरांच्या भिंतींवर विराजणारा स्त्रीपुरुषसमागमाचा हा सोहळा म्हणजे लौकिक जीवनातील लैंगिकता नव्हे. हे संगमोत्सुक जड देह म्हणजे प्रकृति पुरुष किंवा धन-ऋण तत्वांची पार्थिव रूपे आहेत, जिवंत मांसलता वृत्तीची (फ्लेश प्रिन्सिपल) रूपे आहेत. येथे ती जणू समिधा म्हणून वापरली असून जीवनासक्तीचे अर्ध्य देऊन फुलविलेला हा जीवनयज्ञ आहे.
मंदिरांचा अंतर्भाग ख्रिश्चन चर्चप्रमाणे भव्य नसतो. चर्चमध्ये कमानींचा कुशल वापर करून उंची व अंतरावकाश वाढविला जातो. छताखालील खिडक्यांमध्ये चित्रकाच बसवून आतील प्रकाश रंगभारित करण्यात येतो. भारतीय मंदिरातील गाभाऱ्यात अंधार असतो आणि मंडपाच्या खांबांमधून मंद प्रकाशाचा लपंडाव चाललेला असतो.
मंदिरशिल्पांमध्ये, हस्तिदंती कोरणीची आठवण व्हावी इतके नाजुक अलंकरण दगडात केलेले असते. लाकूडकोरणीच्या अनुषंगाने हस्तिदंती कोरणीची अखंड परंपरा प्राचीन काळापासून भारतात चालू आहे. पाँपेई येथील पूर्वोल्लेखित शिल्पावरून याची साक्ष पटते.
हळेबीड, बेलूर येथील होयसळ शैलीसाठी वापरलेला नरम दगड नाजुक कोरणीसाठी मोह उत्पन्न करणारा होता. अबूच्या जैन मंदिरांसाठी वापरलेला संगमरवर कोरणीसाठी अधिक सुलभ असूनही तेथील अलंकरण संयत हाताने केले आहे. कोनारक येथेही त्याचा अतिरेक होत नाही. खजुराहोमध्ये ते अतिशय कुशल, नेटक्या हाताने आणि औचित्याचे भान राखून केले आहे. अलंकरणातील नाजुक रेषात्म प्रेरणांनी मूळ मानवाकृतीची लय धारदार, समृद्ध केली आहे.
स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या, ही प्रत्येक व्यक्तीची सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला कला असे म्हटले जाते. कलानिर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. काही महत्त्वाच्या कला पुढील प्रमाणे:
दृक्कला आणि ललित कला (Visual and Fine Arts) : ‘दृक्कला’ आणि ‘ललित कला’ अशी कलाप्रकारांची विभागणी केली जाते. ललित कलांना आंगिक कला असेही म्हटले जाते. दृक्कलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला, हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत. ‘दृक्कला’ आणि ‘ललित कला’ कलेच्या ‘लोककला’ आणि ‘अभिजात कला’ अशा दोन परंपरा मानल्या जातात.
‘लोककला’ ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे. तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. ‘अभिजात कला’ ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
कलाशैली (Art Style) : कलानिर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडित असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. त्या शैलींच्या आधारे त्या त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो.
भारतातील दृक्कला परंपरा | Drik kala tradition in India in Marathi
दृक्कलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो.
चित्रकला (Painting) :
चित्रकला द्विमितीय असते. उदा., निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात. त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. उदा., अजिंठा लेण्यातील बोधिसत्त्व पद्मपाणिचे भित्तिचित्र.
लोकचित्रकला शैली (Folk Painting Style) :
अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आलेला आहे.
गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो, तसेच मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो.
या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यांसारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. त्या त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला, याची कल्पना या चित्रांद्वारे करता येऊ शकते.
लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्नकार्यात, सणासुदीला भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे तसेच चित्रांच्या साहाय्याने आख्याने सांगणे यांतून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या.
अभिजात चित्रकला (Classical Painting) :
प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कलांस सांगोपांग विचार झालेला दिसतो. त्यामध्ये एकूण ६४ कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम्’ किंवा आलेख्य विदया’ या नावाने केलेला आहे. आलेख्य विदयेची ‘षडांगे’ म्हणजे सहा महत्त्वाचे पैलू आहेत. त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता.
त्यांमध्ये रूपभेद (विविध आकार), प्रमाण ( प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप), भाव (भावप्रदर्शन), लावण्ययोजन (सौंदर्याचा स्पर्श), सादृश्यता (वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण) आणि वर्णिकाभंग (रंगांचे आयोजन) यांचा समावेश आहे. विविध धार्मिक पंथांचे आगमग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रांवरील ग्रंथ यांमधून चित्रकला, शिल्पकला यांच्यासंबंधीचा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो.
हस्तलिखितांमधील लघुचित्रे (Miniatures in Manuscripts) :
हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लीम राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला.
युरोपीय चित्रशैली (European Painting Style) :
ब्रिटिश राजवटीत पाश्चात्त्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवारवाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते.
वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ, कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या ‘येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट’ येथे जतन केलेली आहेत. चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्त्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते.
मुंबईत सन १८५७ मध्ये स्थापन झालेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड इंडस्ट्री या पाश्चात्त्य कलाशैलींचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले.
शिल्पकला (Sculpture) :
शिल्पकला त्रिमितीय असते. उदा., मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. सारनाथ येथील अशोकस्तंभाच्या शीर्षावरील चार सिंहांच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे.
लोकशिल्पकला शैली (Folk Art Style) :
चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळाइतकी प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेचीच सुरुवात होती असे म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती.
ती आजतागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती, गौरींचे मुखवटे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब, वीरगळ, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या, इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात.
अभिजात शिल्पकला शैली (Classical Sculptural Style) :
हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे पाच हजार वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभांपासून भारतातील कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, असे मानले जाते.
आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.
Leave a Reply